चाकण, दि. १ जून : पुणे-नाशिक महामार्गावर कंटेनर चालकाला अडवून त्याच्यावर दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोविंदसिंग भारतसिंग ठाकर (वय २१, रा. काकराता, जि. कासगंज, उत्तर प्रदेश) हे कंटेनर चालक असून, ३१ मे २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील भंडारा हॉटेलसमोरील रस्त्यावर ही घटना घडली.
या प्रकरणी शब्बीर हम्मीद सय्यद (वय २७, रा. वाघेवली, चाकण), गणेश रमेश चंदारे (वय २५, रा. आंबेठाण चौक, चाकण), लखन आयगुडे (वय २७, रा. मोशी) आणि कार्तिक शिवाजी पवार (वय १८, रा. चौफुला, पिंपळे जगताप, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, कंटेनरने गाडीला धडक दिल्याच्या कारणावरून आरोपींनी कंटेनर अडवला. यावेळी पहिल्या आरोपीने कंटेनरची काच फोडली. दुसऱ्या आरोपीने वाहनात चढून फिर्यादीच्या छातीवर दगडाने वार केला तसेच त्यांना दरवाजातून खाली ओढले. त्यानंतर उर्वरित आरोपींसह चौघांनी मिळून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करत शिवीगाळ केली.
या घटनेप्रकरणी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४७२/२०२६ दाखल करण्यात आला असून व्हीएनएस कलम ३(५), ११५(२), ११८(१), १२६(२), ३२४(४) आणि ३५२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाबड करीत आहेत.