सांगली प्रतिनिधी ……जिल्ह्यातील काही खाजगी शाळांकडून विद्यार्थ्यांना व पालकांना शालेय वह्या, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारींवर आता प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. अशा शाळांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सांगली जिल्हाधिकारी व जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी दिले आहे.
ह्युमन राईट्स फॉर प्रोटेक्शन संघटना आणि इस्लामपूर व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. जिल्ह्यातील अनेक खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर व पालकांवर शाळेतूनच शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या प्रकारामुळे पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. अशा प्रकारची सक्ती करणाऱ्या शाळांची माहिती संकलित करून त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी तसेच विद्यार्थी व पालकांचे आर्थिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी राज्य संघटक शालेय साहित्य विक्रेता महासंघाचे अध्यक्ष मोहन पाटील (नाना), इस्लामपूर व्यापारी संघाचे अध्यक्ष अमित इंगळे, शालेय साहित्य विक्रेता संघटनेचे सचिव योगेश गोंदकर, ह्युमन राईट्स फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत, कायदे सल्लागार अॅड. संतोष कदम, वाळवा तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, कडेगाव संपर्कप्रमुख सुरेश घाडगे, सांगली सल्लागार मोहन धनवडे, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक बांदी वडेकडे तसेच इस्लामपूरचे सदस्य सुहास पाटील उपस्थित होते.
