दीपक सूर्यवंशी यांच्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक
पुणे, प्रतिनिधी : संकटसमयी दाखवलेले प्रसंगावधान आणि माणुसकीमुळे एका वाहतूक कर्मचाऱ्याचे प्राण वाचल्याची हृदयस्पर्शी घटना पुण्यात घडली आहे. वाहतूक कार्यालयात कार्यरत असलेले प्रवीण शेंडे यांना अचानक आलेल्या गंभीर वैद्यकीय झटक्यावेळी दीपक सूर्यवंशी यांनी तत्परतेने मदत करून त्यांना वेळेत रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण शेंडे हे मुलाला CET परीक्षेसाठी स्वारगेट येथे सोडण्यासाठी आले होते. परीक्षेचा वेळ संपेपर्यंत ते दीपक सूर्यवंशी यांच्यासोबत गप्पा मारत होते. यावेळी शेंडे यांना प्रचंड घाम येत असल्याचे सूर्यवंशी यांच्या लक्षात आले. त्यांनी शेंडे यांची तब्येत ठीक नसल्याची शक्यता व्यक्त करत तातडीने रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
दोघे स्वारगेटहून रुग्णालयाच्या दिशेने निघाले असताना भवानी पेठ परिसरात शेंडे यांना अचानक गंभीर अटॅक आला. त्यांचे बोलणे बंद झाले, हात-पाय वाकडे झाले तसेच त्यांना दिसेनासे झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दीपक सूर्यवंशी यांनी तात्काळ दुचाकी बाजूला लावली आणि रिक्षाच्या सहाय्याने त्यांना कमला नेहरू रुग्णालयात दाखल केले. आवश्यक औषधे उपलब्ध करून देत त्यांनी उपचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.
दरम्यान, शेंडे यांच्या कुटुंबीयांना घाबरून जाऊ नये यासाठी सूर्यवंशी यांनी संयमाने परिस्थिती हाताळली. त्यांनी कुटुंबीयांना धीर देत शेंडे यांची प्रकृती नियंत्रणात असल्याची माहिती दिली. पुढे त्यांना भोसरी परिसरातील रुग्णालयात हलविण्याची जबाबदारीही त्यांनी स्वतः पार पाडली.
विशेष म्हणजे, स्वतःच्या मुलाच्या परीक्षेसाठी आलेले असतानाही दीपक सूर्यवंशी यांनी आपले वैयक्तिक काम बाजूला ठेवून शेंडे यांच्या उपचाराला प्राधान्य दिले. त्यांच्या या निःस्वार्थ मदतीमुळे प्रवीण शेंडे यांना नवजीवन मिळाले असल्याची भावना व्यक्त होत आहे.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रवीण शेंडे यांनी दीपक सूर्यवंशी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, “संकटाच्या क्षणी धावून येणारी माणसेच खरे देवदूत असतात. दीपक सूर्यवंशी यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे आज मी जिवंत आहे,” अशी भावनिक प्रतिक्रिया दिली.
या घटनेमुळे समाजात माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून दीपक सूर्यवंशी यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
