पुणे, प्रतिनिधी : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या विक्रम काकडे यांना संधी देण्यात आल्याने अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विक्रम काकडे हे माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र असून त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या उमेदवारीमुळे पक्षातील जुन्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना डावलल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत मतभेद उघडपणे समोर येऊ लागल्याचे चित्र आहे.
या निर्णयाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्वती विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष रामदास गाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. तर काही इच्छुक नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू केल्याने पक्षात बंडखोरीची चिन्हे दिसू लागली आहेत.
या मतदारसंघासाठी माजी आमदार सुनील टिंगरे यांचे नावही प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत होते. त्यांनी विक्रम काकडे यांच्यासोबत डमी अर्ज भरला असला तरी पक्षाने विक्रम काकडे हेच अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे टिंगरे समर्थकांमध्येही नाराजी असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड परिसरातून माजी आमदार विलास लांडे शहराध्यक्ष योगेश बहल आणि माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत होती. मात्र या स्थानिक आणि दीर्घकाळ पक्षासाठी कार्यरत असलेल्या नेत्यांना संधी न देता नव्याने पक्षात आलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढल्याचे बोलले जात आहे.
राजकीय वर्तुळात विक्रम काकडे यांना पक्ष नेतृत्वाचा विशेष पाठिंबा असल्याची चर्चा रंगली असून, ते खासदार पार्थ पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे उमेदवारीमागे पक्षातील गटबाजी आणि दबावाचे राजकारण असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे.
“पक्षासाठी वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्यांना संधी नाही आणि आयात नेत्यांना थेट उमेदवारी दिली जाते,” अशी भावना अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असल्याचे सांगितले जात आहे. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर निर्माण झालेली ही नाराजी राष्ट्रवादी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्ष नेतृत्व या असंतोषावर कशी मात करते, याकडे आता राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
