पुणे प्रतिनिधी….ताथवडे, पुनावळे आणि वाकड परिसरातील तीन महत्त्वाच्या सेवा रस्त्यांची (Service Roads) कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. तसेच ताथवडे आणि पुनावळे येथील अंडरपासमध्ये वाढत असलेली वाहतूक कोंडी लक्षात घेऊन ते रुंद करण्याच्या सूचनाही संबंधित प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.ही माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली. पुण्यात शनिवारी राष्ट्रीय महामार्गांवरील प्रलंबित कामांच्या आढावा बैठकीत त्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ (पुणे पश्चिम बायपास) परिसरातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न मांडले.
आमदार जगताप यांनी बैठकीत सयाजी अंडरपास, भुमकर चौक, ताथवडे अंडरपास, पुनावळे अंडरपास, पवना नदी क्रॉसिंग,किवळे जंक्शन आणि मामुर्डी अंडरपास या भागांतील अपुऱ्या क्षमतेच्या भुयारी मार्गांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले. या ठिकाणी सेवा रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
नागरिकांच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन सेवा रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करण्याचे सक्त निर्देश गडकरी यांनी दिले आहेत. तसेच पुनावळे, वाकड, किवळे आणि रावेत या प्रमुख वाहतूक केंद्रांवर वाढता ताण लक्षात घेता अतिरिक्त बॉक्स स्ट्रक्चर्स आणि नवीन अंडरपास उभारण्यासही तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे.
या निर्णयांमुळे ताथवडे, पुनावळे, वाकड, किवळे आणि रावेत परिसरातील दैनंदिन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, तसेच राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
