पुणे प्रतिनिधी…..पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला आहे.
या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११४/२०२६ तसेच हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०५, ११०, १२३, १२५, २७५ व ३(५) तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई), ६८, ८१ व ८३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार दिनांक २९ मे २०२६ रोजी या दोन्ही गुन्ह्यांचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.
या दुर्घटनेत आतापर्यंत दापोडी परिसरातील ११ जणांचा मृत्यू झाला असून हडपसर परिसरात ४ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ वर पोहोचला आहे.
दापोडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ११४/२०२६ मध्ये आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या दोन्ही गुन्ह्यांचा सखोल तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत सुरू असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात अवैध मद्यविक्री व पुरवठा साखळीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून तपास यंत्रणा दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.