जालना | प्रतिनिधी…..जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या एका तरुणास पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून १ लाख १२ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू आणि अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांना अवैध दारूच्या साठ्याबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील किर्ती ट्रान्सपोर्टसमोर सापळा रचला.
दरम्यान, विनापरवाना काळ्या रंगाच्या ॲक्टिव्हा दुचाकीवरून (क्र. एमएच-२१-बीएल-५४४८) देशी व विदेशी मद्याची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ छापा टाकून संबंधित व्यक्तीस ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान इम्पेरिअल ब्ल्यू, रॉयल स्टॅग, ८ पीएम, मॅजिक मोमेंट यांसारख्या विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या बाटल्या, किंगफिशर व बडवायझर बिअर तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली सुमारे ७५ हजार रुपये किमतीची ॲक्टिव्हा दुचाकी जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख १२ हजार ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी योगेश वामेश्वर पिसार (वय २१, रा. सरस्वती मंदिर रोड, खरपुडी, जालना) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ)(ई) अन्वये चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक स्कॉट, देशमाने, सय्यद, पोहेकॉ देशमुख, वायकोस तसेच पोलीस कॉन्स्टेबल सागर खैरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ देशमुख करीत आहेत.
