२१ अधिकारी-कर्मचारी तात्काळ निलंबित; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर
पुणे, प्रतिनिधी दिं.३१ मे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणात राज्य सरकारने मोठी आणि कठोर कारवाई करत पोलीस दल व राज्य उत्पादन शुल्क विभागातील एकूण 21 अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे. या कारवाईमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून अवैध दारू व्यवसायाविरोधात सरकारने ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या दोन दिवसांत हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात विषारी दारूचे सेवन केल्याने १३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. तर अनेक जण विविध रुग्णालयांत उपचार घेत असून काहींची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच या प्रकरणातील दोषींना कोणतीही गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशाराही दिला. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर जबाबदारी निश्चित करण्यासाठी प्रशासनाने चौकशीची गती वाढवली.
प्राथमिक चौकशीत काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात निष्काळजीपणा दाखविल्याचे तसेच संबंधित भागांतील अवैध दारू विक्री आणि उत्पादनाकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले. त्यानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ८ अधिकारी व कर्मचारी, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील १३ अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, विषारी दारूच्या निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या संपूर्ण साखळीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या प्रकरणामागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे राज्यातील अवैध दारू व्यवसायाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी नियंत्रण यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त होत आहे. सरकारच्या या मोठ्या कारवाईमुळे संबंधित विभागांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काही दिवसांत आणखी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठळक बाबी…..
▪️ पुणे-पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरणात १३ जणांचा मृत्यू
▪️ अनेक जणांवर रुग्णालयात उपचार सुरू
▪️ पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागातील २१ जण निलंबित
▪️ मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका; दोषींवर कारवाईचे आदेश
▪️ अवैध दारू रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष तपास पथके सक्रिय
▪️ आणखी कारवाईची शक्यता
“विषारी दारूमुळे निष्पाप नागरिकांचे जीव जाण्याची घटना अत्यंत गंभीर असून जबाबदार व्यक्तींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही,” असा ठाम संदेश राज्य सरकारने या कारवाईतून दिला आहे.
