पुणे : दापोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुगेवाडी परिसरात विषारी हातभट्टीची दारू पिल्याने १० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११४/२०२६ दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आतापर्यंत ६ आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २६ मे २०२६ ते २८ मे २०२६ या कालावधीत फुगेवाडी परिसरात काही नागरिकांनी गावठी हातभट्टीची दारू सेवन केली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडून १० जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पांडुरंग सखाराम फुगे, अकबर अजिमखान पठाण, राजेश शांताराम राजपूत, आनंद पांडेराव देसाई, आनंद काशीनाथ निकाळजे, भिमण्णा बसण्णा नागराल, अक्षय अशोक अवसरमल, सचिन रामचंद्र नेटके, सुरप्पा मनप्पा बंगारी आणि राजू प्रकाश राठोड यांचा समावेश आहे. सर्व मृतक हे फुगेवाडी, दापोडी परिसरातील रहिवासी आहेत.
मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून पुढील तपासासाठी व्हिसेरा नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल अद्याप प्रलंबित आहे.या विषारी दारूमुळे आणखी पाच जणांची प्रकृती गंभीर झाली असून त्यांच्यावर औंध येथील मेडीपॉईंट हॉस्पिटल तसेच पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०५, १२३, ११०, १२५, २७५, ३(५) तसेच महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमातील कलम ६५ (ई), ६८, ८१ व ८३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी कर्नेलसिंह तखतसिंह विरका, गुरमंगतसिंह कर्नेलसिंह विरका, योगेश रामचंद्र व्हानकडे आणि राधेशाम हरिराम प्रजापती यांना अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना ८ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.तसेच श्रीमती इंदरजीत कौर कर्नेलसिंह विरका आणि कल्पेश अशोक आग्रवाल यांनाही अटक करण्यात आली असून त्यांना ३० मे रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागानेही स्वतंत्र कारवाई करत आकाश जाधव, इरफान निसार कुरेशी आणि आर्यन संजय धोत्रे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.या घटनेमुळे फुगेवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बेकायदा हातभट्टी व्यवसायावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे
