गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संपर्क; पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन दिला धीर
फुगेवाडी परिसरात रात्री ११ नंतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश, पोलिसांना कडक सूचना
पिंपरी-चिंचवड : फुगेवाडी येथील संजयनगर परिसरात विषारी हातभट्टीची दारू पिल्याने सुमारे दहा जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर हादरले आहे. या प्रकरणात चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी आक्रमक भूमिका घेत थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
या अवैध दारू व्यवसायाला पाठबळ देणाऱ्या, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आमदार जगताप यांनी शासनाकडे केली आहे. तसेच या रॅकेटमधील केवळ किरकोळ विक्रेत्यांवर नव्हे, तर संपूर्ण साखळीतील मुख्य सूत्रधारांवरही कठोर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
मृतांच्या कुटुंबीयांची भेट; शासन मदतीची ग्वाही
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार शंकर जगताप यांनी शुक्रवारी फुगेवाडी येथील संजयनगर परिसराला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मृत सचिन नेटके, अक्षय अवसरमल, विजय राठोड, राजेंद्र राठोड, अकबर पठाण आणि बाबा शेख यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
“या कठीण काळात शासन आणि आम्ही सर्वजण मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. पीडित कुटुंबीयांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा तसेच आवश्यक ती शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
परिसरातील कोणत्याही नागरिकाला अचानक त्रास जाणवल्यास त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालय अथवा वायसीएम रुग्णालयात दाखल करून उपचार देण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक
घटनेनंतर आमदार जगताप यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीला पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे आणि पोलीस निरीक्षक भीमराव कोळी उपस्थित होते.
बैठकीत परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक कडक करण्यासह अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यावर भर देण्यात आला. फुगेवाडी परिसरातील सर्व दुकाने आणि टपऱ्या रात्री ११ नंतर सक्तीने बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले. तसेच रात्रीच्या वेळी विनाकारण फिरणाऱ्या तरुणांबाबत त्यांच्या पालकांना बोलावून समुपदेशन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
“दोषींना शिक्षा मिळेपर्यंत गप्प बसणार नाही”
“फुगेवाडीत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आहे. या अवैध धंद्याला चालना देणाऱ्या, त्याकडे डोळेझाक करणाऱ्या दोषी पोलीस अधिकारी आणि उत्पादन शुल्क विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांवर तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे,” असे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.
“या प्रकरणाच्या तपासात कोणतीही चालढकल किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. सर्व दोषींना शिक्षा मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
परिसरात भीतीचे वातावरण
फुगेवाडी आणि संजयनगर परिसरात या घटनेनंतर भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अवैध हातभट्टी व्यवसायाविरोधात नागरिकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
