पुणे : बावधन परिसरातील मुंडे वस्ती, क्षत्रियनगर येथे रोडवर पाणी मारण्याच्या किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या वादाचे रुपांतर जोरदार हाणामारीत झाले. या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन पोलिस ठाण्यात गु.रजि. नं. २०४/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ मे २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुंडे वस्ती, क्षत्रियनगर, बावधन येथे घडली. याप्रकरणी यश सुनिल राजपुत (वय २२, व्यवसाय रिअल इस्टेट, रा. अत्रिवनगर, बावधन) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये राजेश राजपुत, चेतन राजपुत आणि राधिका राजपुत (सर्व रा. मुंडे वस्ती, क्षत्रियनगर, बावधन) यांचा समावेश असून अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही.
फिर्यादीनुसार, रोडवर पाणी मारल्यामुळे पाणी घरात आणि देवळात येत असल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीच्या नातेवाईकांसोबत वाद घातला. यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत धमक्या दिल्या. त्यानंतर वाद अधिकच चिघळला आणि आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
यामध्ये आरोपींनी फिर्यादी यश राजपुत यांना पकडून ठेवत आरोपी महिलेने त्यांच्या डोक्यात हातोडी मारल्याचे तसेच दगडाने हल्ला करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. भांडण सोडविण्यासाठी आलेले प्रताप राजपुत यांनाही डोक्यात दगड मारून जखमी करण्यात आले. तसेच फिर्यादीचा भाऊ आणि पत्नी यांनाही मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणाचा पुढील तपास पो.उप.नि पवार करीत आहेत.