पिंपरी-चिंचवड : ताथवडे गावठाण परिसरात मांजरांच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २६ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पंचशील नगर, ताथवडे गावठाण येथे घडला. याप्रकरणी कविता चिंतामणी सोनवणे (वय ६०, रा. पंचशील नगर, ताथवडे गावठाण) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यावरून सीमा अनिल सूर्यवंशी, मानसी सूर्यवंशी आणि सारंग सूर्यवंशी (सर्व रा. पंचशील नगर, ताथवडे गावठाण) यांच्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
फिर्यादी यांच्या घरावर आरोपींची मांजरे येत असल्याच्या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. त्यावेळी आरोपींनी फिर्यादींना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच सीमा सूर्यवंशी यांनी मागून येत फिर्यादींचे केस ओढले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, सारंग सूर्यवंशी याने फुटपाथवरील वीट उचलून फिर्यादींच्या कपाळावर मारल्याने त्या जखमी झाल्या.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.