३.९ किलो गांजासह आरोपी जेरबंद; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी, दि. २८ : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने थेरगाव परिसरात धडक कारवाई करत एका आरोपीला तब्बल ३९१५ ग्रॅम गांजासह ताब्यात घेतले. या कारवाईत मोबाईल फोन व दुचाकीसह एकूण ३ लाख ३० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस उपआयुक्त गुन्हे प्रदीप जाधव व सहाय्यक पोलीस आयुक्त प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक पिंपरी-चिंचवड शहरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार सदानंद रुद्राक्षे व गोविंद डोके यांना एमएच-१४-एनजे-४१७० या मोपेडवरील इसम संशयास्पद आढळला. त्यानंतर २७ मे रोजी सायंकाळी सुमारे ६.१० वाजता काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेरगाव स्मशानभूमी परिसरात, गोपाळ जगताप यांच्या घरासमोर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अशोक संतोष आडवाणी (वय २८, रा. पवनेश्वर कॉलनी, थेरगाव गावठाण, पुणे) असे आहे. त्याच्याकडून ३९१५ ग्रॅम गांजा, एक मोबाईल फोन आणि मोपेड असा एकूण ३ लाख ३० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि स्वप्निल चव्हाण करत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त प्रदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, स.पो.नि स्वप्निल चव्हाण, पो.उप.नि जिलानी मोमीन, महिला पोलीस हवालदार सुषमा पाटील, पोलीस शिपाई सदानंद रुद्राक्षे, गोविंद डोके, कपिलेश इगवे, सुभाष गुरव यांच्या पथकाने विशेष कामगिरी बजावली. तसेच पोलीस अंमलदार सुभाष गुरव यांनी तांत्रिक विश्लेषणासाठी मदत केली.
दरम्यान, अंमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ८६००००२३२० या क्रमांकावर, पोलीस हेल्पलाईन ११२ वर किंवा ‘मानस’ हेल्पलाईन १९३३ वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
