नगरसेविका ऐश्वर्या ताई पठारे यांची “कार्य तत्परता दिसतेय व काम बोलतेय”
पुणे, दि. २७ मे : येरवडा येथील आचार्य अत्रे प्राथमिक विद्यालय, मनपा शाळा क्र. ५१ परिसरातील कचरा वर्गीकरण (Segregation) पॉईंट अखेर स्थलांतरित करण्यात आल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पॉईंटमुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरत होती आणि विद्यार्थ्यांना गैरसोयीच्या वातावरणात शिक्षण घ्यावे लागत होते.
दि. २२ एप्रिल रोजी शाळेच्या पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी ही गंभीर समस्या निदर्शनास आणून दिली होती. शाळेच्या पाठीमागील कचरा वर्गीकरण केंद्रामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात आली होती.
या समस्येची तातडीने दखल घेत संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने कारवाई करत दि. २३ मे रोजी सदर सेग्रीगेशन पॉईंट अन्यत्र स्थलांतरित केला.
याबाबत सौ. ऐश्वर्या सुरेंद्र पठारे आणि श्री. सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, “विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत. आता विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात शिक्षण घेता येईल.”
