पिंपरी-चिंचवड : शहरातील चऱ्होली परिसरातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या घरकुल परिसरातील अनेक चेंबर तुटलेल्या अवस्थेत असून गेल्या महिनाभरापासून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. तुटलेल्या चेंबरमुळे परिसरात अपघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील रस्ते आणि गटारांवरील चेंबरची झाकणे तुटलेली किंवा उघडी पडलेली आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत आहे. अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांनी प्रशासनाने तातडीने पाहणी करून सर्व तुटलेले चेंबर दुरुस्त करावेत, सुरक्षित झाकणे बसवावीत तसेच भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी नियमित देखभाल करावी, अशी मागणी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने वेळीच पावले उचलावीत, अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास त्याला संबंधित यंत्रणाच जबाबदार राहील, असा इशाराही संतप्त रहिवाशांनी दिला आहे.
