पिंपरी-चिंचवड : आंबेठाण येथील हनुमान मंदिराच्या मागील रस्त्यावर वासुली फाटा ते बिरदवाडी फाटा दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या रस्त्यावरील सा.क्र. ४/४७० ते ४/५७० (लांबी १०० मीटर) या भागात काँक्रीटीकरणाचे काम करण्यात येणार असून, दि. २८ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजल्यापासून ते २९ मे २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक बदल अधिसूचना लागू राहणार आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांनी मोटार वाहन कायद्यान्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून ही अधिसूचना जारी केली आहे.
बंद राहणारा मार्ग
आंबेठाण हनुमान मंदिराच्या मागील रस्त्यावर वासुली फाटा ते बिरदवाडी फाटा दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग……
💮तळेगावकडून येणारी वाहने वासुली फाटा – एच.पी. चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.
💮भारत पेट्रोल पंपाशेजारील चौक – महाळुंगे गाव वाय पॉईंट मार्गाचा वापर करता येईल.
💮आंबेगाव – महाळुंगे गाव वाय पॉईंट मार्ग खुला राहणार आहे.
💮चाकण/खेड बाजूकडून येणारी वाहने बिरदवडी चौक – महाळुंगे गाव वाय पॉईंट मार्गे वळविण्यात येतील.
💮बिरदवडी चौक – वाघजाई चौक मार्गाचाही पर्यायी मार्ग म्हणून वापर करता येणार आहे.
जड वाहनांना विशेष बंदी
पुणे-नाशिक महामार्गावरील भाम फाटा आणि आंबेठाण चौक येथून बिरदवडी फाट्याकडे जाणाऱ्या सर्व जड आणि अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनांनी चाकण-तळेगाव चौक मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.