पुणे : उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात कौटुंबिक वादातून मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ मे २०२६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वासोली येथील ट्रेद्रा कंपनीजवळ, जांभळे यांच्या समता बेड परिसरात घडली.
याप्रकरणी तात्याराव बाबाराव तायडे (वय ४८, व्यवसाय हाऊस किपिंग, रा. वासोली फाटा, ता. खेड, जि. पुणे, मूळगाव वाशिम) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवि धर्माजी सावळे (वय ३८) आणि अतुल धर्माजी सावळे (वय ३०, दोघे रा. वासोली, ट्रेद्रा कंपनीजवळ, ता. खेड, जि. पुणे) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी प्रिती हिने तिचे आधारकार्ड व इतर कागदपत्रे आणण्यासाठी आरोपींच्या घरी भेट दिली होती. त्यावेळी आरोपींनी तिला कुठेही जाणार नाही आणि कोणतेही सामान नेणार नाही असे सांगत अडवले. यानंतर प्रिती हिने वडिलांना फोन करून बोलावून घेतले.
फिर्यादी घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी “तुम्ही माझ्या पत्नीला कसे नेता हेच पाहतो” असे म्हणत वाद घातला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी फिर्यादी, प्रिती सावळे आणि चैत्राली तायडे यांना हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच आरोपी रवि सावळे याने घरातील कुकर डोक्यात मारून फिर्यादीस दुखापत केली, तर दुसऱ्या आरोपीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास उत्तर महाळुंगे पोलीस करत आहेत.