पिंपरी-चिंचवड, दि. २३ मे २०२६ (प्रतिनिधी): चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटलमधील सुमारे ४०० कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांनी थकीत वेतन आणि कोरोना काळातील मानधनाच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन छेडले आहे. गेल्या १० ते ११ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
आंदोलनस्थळी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी उपस्थित राहून हॉस्पिटल प्रशासनाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला.
भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, व्ही. जी. वैद्य आणि एन. व्ही. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे हे ट्रस्टचे हॉस्पिटल अलीकडेच दुसऱ्या व्यवस्थापनाकडे हस्तांतरित करण्यात आले असून ते सह्याद्री ग्रुपने विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. नव्या व्यवस्थापनाने कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांऐवजी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याची भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.
कोविड काळात जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून कमी करण्यात आल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.
या प्रकरणी कामगार आयुक्त कार्यालय तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या उपस्थितीत अनेक बैठका झाल्या. पोलिस प्रशासनानेही मध्यस्थी करत किमान थकीत वेतन देण्याची सूचना व्यवस्थापनाला केली होती. मात्र, व्यवस्थापनाने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
सध्या व्यवस्थापनाचे प्रतिनिधी सुनील काळे यांनी पोलिसांसोबत झालेल्या चर्चेत सोमवारपर्यंत वेतनाबाबत निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, सह्याद्री ग्रुपचे चेअरमन चारू आपटे हे कामगारांच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेतील आणि कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देऊन त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेतील, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली आहे.सोमवार, दि. २५ मेपर्यंत समाधानकारक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी दिला आहे.
