पिंपरी चिंचवड……शहरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नमाज पठण आणि तात्पुरत्या कत्तलखान्यामुळे वाढणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक शाखेकडून तात्पुरते वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. हे आदेश विवेक पाटील यांनी मोटार वाहन कायद्यान्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जारी केले आहेत.
निगडी वाहतूक विभागाच्या हद्दीत चाफेकर चौक येथील ईदगाह मैदानावर मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी येणार असल्याने दि. २७ मे २०२६ रोजी सकाळी ५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.
निगडी वाहतूक विभागातील बदल
💮मरीआई माता मंदिर ते चाफेकर चौक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे.
💮एसकेएफ कंपनीकडून अहिंसा चौक मार्गे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
💮तसेच सेव्हन ऑरेंज हॉस्पिटल मार्गेही वाहतूक वळविण्यात येणार आहे.
💮चाफेकर चौक ते मरीआई माता मंदिर मार्गावरील वाहतूकही बंद राहील.
💮जुना जकात नाका मार्गे सेव्हन ऑरेंज हॉस्पिटल रस्ता वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
💮तसेच अहिंसा चौक मार्गेही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
💮मोरया नगर ते चाफेकर चौक मार्ग बंद राहणार असून वाहनांना हनुमान मंदिर येथून सेव्हन ऑरेंज हॉस्पिटलमार्गे वळविण्यात येणार आहे.
अत्यावश्यक सेवांतील वाहने वगळता इतर सर्व वाहनांसाठी हे निर्बंध लागू राहतील.दरम्यान, चिखली वाहतूक विभागाच्या हद्दीत हॉकी स्टेडियम चौक परिसरात पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कत्तलखान्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे दि. २८ मे २०२६ सकाळी ६ वाजल्यापासून दि. २९ मे २०२६ रात्री ९ वाजेपर्यंत वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
*चिखली वाहतूक विभागातील बदल*
💮हॉकी स्टेडियम चौक ते गुलाब पुष्प उद्यान चौक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे.
💮नेहरूनगरकडून येणारी वाहने ‘क’ प्रभाग कार्यालय आणि बीएचटीसी कंपनीसमोरील मार्गे गुलाब पुष्प उद्यान चौकाकडे वळविण्यात येतील.
💮गुलाब पुष्प उद्यान चौकातून हॉकी स्टेडियमकडे जाणारी वाहनेही पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत.
शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच कत्तलखान्याकडे जाणाऱ्या वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.