शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात घोषणाबाजी
पिंपरी-चिंचवड : आरसीसी क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसी क्लासेसच्या फलकाची संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. शिक्षण व्यवस्थेमध्ये सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
या आंदोलनात पुणे जिल्हा कार्याध्यक्ष भैय्यासाहेब गजधने, ब्रह्मानंद जाधव, प्रसाद दौंडकर यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
