पिंपरी चिंचवड | दि. १९ मे २०२६….पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सुमारे ६० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा सविस्तर चौकशी अहवाल अखेर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी महापौर रवि लांडगे यांना सादर केला. या अहवालात लेखापाल प्रविण जैन यांच्यावर गंभीर ठपका ठेवण्यात आला असून, या प्रकरणासाठी त्यांनाच जबाबदार धरण्यात आले आहे.
अहवालानुसार, बँकेत ठेवलेल्या मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरातील तफावत आणि आर्थिक नुकसानासाठीही प्रविण जैन जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच ठराविक बँकेला प्राधान्य देत गुंतवणूक केल्याचा मुद्दाही समोर आला आहे.
दरम्यान, संबंधित चौकशी अहवाल महापौरांकडे सादर करण्यात झालेल्या विलंबामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याबाबत माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने तत्काळ हालचाल करत मंगळवारी अहवाल महापौरांकडे सुपूर्द केला.
यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत महापौर रवि लांडगे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे आणि नगरसेवक उत्तम केंदळे उपस्थित होते.
महापौर रवि लांडगे म्हणाले की, “२४ मार्च रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत बोगस उपसूचनांचा मुद्दा समोर आला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. काम न करता बिले दिली असतील, तर संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. शासनाचे पत्र प्राप्त होताच लेखापालावर गुन्हा दाखल करण्यात येईल.”
स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले की, “लेखापालांनी केलेला घोटाळा आता सिद्ध झाला आहे. बोगस उपसूचनांच्या आधारे बिलांचे वाटप करण्यात आले. एफडी प्रकरणातही महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले असून, यात केफोची चूक स्पष्टपणे दिसून येते.”
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी माहिती दिली की, शासनाकडे चौकशी अहवाल पाठविण्यात आला असून १४ उपसूचनांच्या आधारे बिलांची अदायगी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात केफोवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.