शिवशाही व्यापारी संघाचा जाहीर पाठिंबा
पिंपरी-चिंचवड, दि.१९ मे २०२६ : फेरीवाला हॉकर्स महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने पथविक्रेते, हातगाडी, टपरी व पथारी धारकांच्या विविध मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका गेटसमोर सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाला शिवशाही व्यापारी संघाने जाहीर पाठिंबा दिला आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगितले.
या उपोषणाचे नेतृत्व प्रल्हाद भाऊ कांबळे करत असून, यावेळी युवराज दाखले यांनी महापालिका प्रशासन आणि आयुक्तांना इशारा देत पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री नियमन) महाराष्ट्र योजना २०१४ ची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली. तसेच फेरीवाल्यांवर होणारी कारवाई थांबवून त्यांना ओळखपत्र व अधिकृत परवाने देण्याची मागणीही त्यांनी केली.
“पथविक्रेते हे शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. अनेक गरीब कुटुंबे हातगाडी, टपरीच्या माध्यमातून उदरनिर्वाह करतात. त्यांच्यावर अन्यायकारक कारवाई करणे योग्य नाही. महापालिकेने तातडीने स्ट्रीट व्हेंडर्स झोन निश्चित करून अधिकृत जागा उपलब्ध करून द्याव्यात,” असे युवराज दाखले यांनी सांगितले.
फेरीवाला हॉकर्स महासंघाच्या वतीने करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये पथविक्रेत्यांवरील अतिक्रमण कारवाई थांबवणे, ओळखपत्र व परवाने देणे, पक्के गाळे उपलब्ध करून देणे, पथविक्रेता कायदा २०१४ ची अंमलबजावणी करणे, अधिकृत जागांचे वाटप करणे आणि उर्वरित पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्याचा समावेश आहे.
“महापालिका आयुक्तांनी पुढील ४८ तासांत बैठक घेऊन प्रश्न सोडवावा. अन्यथा शिवशाही व्यापारी संघ, हिंदू मातंग सेना आणि फेरीवाले मिळून महापालिकेवर धडक मोर्चा काढतील,” असा इशाराही युवराज दाखले यांनी दिला.
यावेळी शिवशाही व्यापारी संघ प्रदेशाध्यक्ष कृष्णा साबळे, उद्योजक अनिल दादा गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, मांगल्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजू आवळे, शिवशाही माथाडी कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सचिन दोनगहू यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
