पुणे, दि. १९ मे : डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची विधानपरिषदेवर सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिवशाही व्यापारी संघ यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले तसेच भीमशक्ती-शिवशक्ती-लहुशक्ती समन्वय प्रमुख गुलाबराव गरूड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना युवराज दाखले म्हणाले की, डॉ. नीलमताई गोऱ्हे या महाराष्ट्राच्या राजकारणातील झुंजार आणि लढाऊ महिला नेतृत्व असून सलग पाच वेळा बिनविरोध निवडून येणे हा त्यांच्या कार्याचा आणि जनतेशी असलेल्या नात्याचा मोठा पुरावा आहे. महिलांचे प्रश्न, कामगारांचे हक्क आणि व्यापारी वर्गाच्या अडचणी सोडवण्यासाठी त्या विधानपरिषदेत नेहमीच आक्रमक भूमिका घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
“नीलमताई या केवळ शिवसेनेच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत. विरोधकांनाही त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करता येत नाही, हीच त्यांची खरी ताकद आहे,” असेही दाखले यांनी नमूद केले. तसेच शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महिला सक्षमीकरण, बचत गट चळवळ, हुंडाबळी विरोधी कायदा तसेच व्यापारी महिलांच्या हक्कांसाठी डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे सांगत पिंपरी-चिंचवडमधील व्यापारी आणि कामगार महिलांच्या प्रश्नांबाबत त्यांनी सातत्याने सहकार्य केल्याचे युवराज दाखले यांनी नमूद केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशाही व्यापारी संघाची महिला आघाडी अधिक जोमाने कार्य करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास मंगेश डाखोरे, सचिन जाधव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
