विमाननगर ते वाघोली मार्गावर सहा आसनी रिक्षांत दहा-दहा प्रवासी; नियमांचा रस्त्यावरच चुराडा
पुणे : ‘स्मार्ट सिटी’च्या गप्पा रंगत असताना विमाननगर ते वाघोली आणि खराडी आयटी पार्क मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा मात्र अक्षरशः खेळखंडोबा होत असल्याचे चित्र दिसत आहे. सहा आसनक्षमतेच्या रिक्षांमध्ये दहा ते बारा प्रवासी कोंबून वाहतूक केली जात असून, वाहतूक पोलीस आणि आरटीओकडून ठोस कारवाई होत नसल्याने रिक्षाचालक बिनधास्त झाले आहेत.
सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन गर्दीच्या वेळेत आयटी कर्मचारी, महिला आणि विद्यार्थ्यांना अक्षरशः एकमेकांच्या अंगावर बसून प्रवास करावा लागत आहे. अनेकदा प्रवासी रिक्षेच्या अर्ध्या बाहेर लटकलेल्या अवस्थेत प्रवास करताना दिसतात. मात्र प्रशासनाचे लक्ष केवळ ‘विशेष मोहीम’ आणि कागदी कारवाईपुरतेच मर्यादित असल्याची तीव्र नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.
“ओव्हरलोडिंग विरोधात कारवाई सुरू आहे,” असा दावा वाहतूक विभागाकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात रस्त्यावर नियमांचा उघडपणे भंग होताना दिसतो. त्यामुळे संबंधित यंत्रणांना हे प्रकार दिसत नाहीत का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नो-पार्किंग, ओव्हरलोडिंग आणि वाहतूक कोंडी यामुळे या मार्गावरील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मात्र अधिकारी नेहमीप्रमाणे “विशेष मोहीम राबवू” या पारंपरिक उत्तरावरच समाधान मानत असल्याची टीका होत आहे.
दरम्यान, अतिरिक्त प्रवासी घेणाऱ्या रिक्षांविरोधात तक्रार करण्यासाठी आरटीओकडून देण्यात आलेला ८२७५३३०१०१ हा व्हॉट्सॲप क्रमांकही निष्प्रभ ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तक्रारींना प्रतिसाद मिळत नसल्याने आणि अनेक संदेश ‘सीन’देखील होत नसल्याने “तक्रार करा” हा सल्ला केवळ औपचारिकता ठरत असल्याची चर्चा आहे.
एका रिक्षाचालकाने दिलेले उत्तर तर प्रशासनाच्या अपयशावर शिक्कामोर्तब करणारे ठरत आहे. “२० रुपयांत सीट हवी असेल तर ॲडजस्टमेंट करावी लागेल; आरामदायी प्रवास हवा असेल तर खासगी रिक्षा करा,” असे उघडपणे सांगण्याइतका चालकांचा आत्मविश्वास वाढल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
दररोज हजारो प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करत असताना प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
