८६ हजारांचा आयफोन अन् ५० हजारांचा लॅपटॉप सुखरूप परत; चालक-वाहकांसह कंट्रोलर यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक
पुणे : प्रतिनिधी.….पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श निर्माण केला आहे. गेल्या दोन दिवसांत पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांचे बसमध्ये विसरलेले सुमारे ८६ हजार रुपये किमतीचा ॲपल आयफोन आणि ५० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप व शैक्षणिक साहित्य असलेली बॅग संबंधित प्रवाशांना सुखरूप परत केली. कर्मचाऱ्यांच्या या प्रामाणिक कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पहिल्या घटनेत स्वारगेट आगारातील बसमध्ये एका प्रवाशाचा सुमारे ८६ हजार रुपये किमतीचा ॲपल आयफोन १५ आढळून आला. स्वारगेट आगारातील कायम वाहक संदीप शिवाजीराव सातपुते (कर्मचारी क्र. ४७१५) आणि कायम चालक समाधान लक्ष्मण चव्हाण (कर्मचारी क्र. ५३१९) यांनी हा मोबाईल सुरक्षित ठेवत संबंधित प्रवाशाला परत करण्यासाठी पुढाकार घेतला.
दुसऱ्या घटनेत पुणे स्टेशन ते दिघी-आळंदी या मार्गावरील प्रवासादरम्यान एका प्रवाशाची सुमारे ५० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप आणि महत्त्वाचे शालेय साहित्य असलेली बॅग बसमध्ये विसरली गेली. बसचे वाहक श्रावण किसन पिंपळसे यांनी ही बॅग आळंदी स्थानकावरील कंट्रोलर आवडाजी पवळे आणि गोविंद गुट्टे यांच्या ताब्यात दिली. संबंधित कर्मचाऱ्यांनी आवश्यक खातरजमा करून ती बॅग प्रवाशाला सुखरूप परत केली.
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेली प्रामाणिकता, तत्परता आणि प्रवाशांप्रती असलेली बांधिलकी कौतुकास्पद आहे. दररोज हजारो प्रवाशांना सेवा देणाऱ्या पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांच्या अशा कृतीमुळे महामंडळावरील प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होत आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संदीप सातपुते, समाधान चव्हाण, श्रावण पिंपळसे, आवडाजी पवळे आणि गोविंद गुट्टे यांचे पीएमपीएमएल प्रशासनाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
प्रामाणिकपणाची परंपरा जपणारे पीएमपीएमएलचे कर्मचारी; प्रवासी सेवेतून माणुसकीचा आदर्श!
