तरुणांनी देशहितासाठी आणि महिला संरक्षणासाठी कटिबद्ध राहावे : लोकसेवक युवराज दाखले यांचे आवाहन
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :…..आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी लहुजी वस्ताद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते, महिला पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
लहुजी वस्ताद साळवे यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी अनेक क्रांतिकारक घडविले. शस्त्रविद्या, कुस्ती, शिस्त आणि देशभक्तीचे धडे देत तरुणांमध्ये स्वाभिमान व स्वराज्याची प्रेरणा निर्माण केली. जात-पात आणि भेदभावाच्या पलीकडे जाऊन समाजाला एकत्रित करण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्यांच्या या ऐतिहासिक योगदानाचे स्मरण यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी शिवशाही शासन पक्ष व अखिल भारतीय हिंदू मातंग संघाचे संस्थापक प्रमुख लोकसेवक युवराज दाखले यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “लहुजी वस्ताद हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर ते विचारांचे गुरू होते. त्यांच्या विचारांचा खरा वारसा म्हणजे केवळ जयघोष करणे नव्हे, तर अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणे होय. आजच्या तरुणांनी देशहितासाठी आणि महिला संरक्षणासाठी कायम कटिबद्ध राहिले पाहिजे. महिलांचा सन्मान, सुरक्षा आणि समाजात त्यांना योग्य स्थान मिळवून देण्यासाठी प्रत्येक तरुणाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.”
जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात लहुजी वस्ताद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. तसेच तरुणांनी व्यसनमुक्ती, शिक्षण, शिस्त आणि समाजसेवेचा संकल्प केला.
यावेळी उपमहापौर शर्मिलाताई बाबर, नगरसेविका अनुराधाताई गोरखे, भगवान शिंदे, संजय ससाणे, नितीन घोलप, सतीश भवाळ, संदीप जाधव, विशाल कसबे, शिवशाही महिला अध्यक्षा उषामाई कांबळे, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्षा दिपाली केंगारे, अलका गायकवाड, मालन गायकवाड, माजी अध्यक्षा ज्योती वैरागर, आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व महिला अध्यक्षा वैशाली जाधव, अध्यक्ष नानासाहेब कांबळे, भारती चांदणे, आशा शहाणे, केशरताई लांडगे, गणेश कलवले, शिवाजी खडसे, सुहास यादव, अनिकेत साळवे, हरिमान खवळे, भाऊ कसबे आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.
