२१.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त; चैन चोरी व मंगळसूत्र चोरीचे १३ गुन्हे उघड
पुणे : गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दीचा फायदा घेत भाविकांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा फरासखाना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील विजयपाल कवर सैन (वय ३४) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून २१ लाख २१ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत सोनसाखळी चोरी आणि मंगळसूत्र चोरीचे एकूण १३ गुन्हे उघडकीस आले आहेत.
दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजता सागर कोमटी हे मित्रासह बुधवार चौकातील बेलबाग चौकाजवळ गणेश विसर्जन मिरवणूक पाहत उभे होते. यावेळी सहा अनोळखी व्यक्तींनी त्यांना घेरून मारहाण केली. चाकूचा धाक दाखवत लोखंडी कटरच्या साहाय्याने त्यांच्या गळ्यातील ३८.३२० ग्रॅम वजनाची, एक लाख २१ हजार ४७६ रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावून घेतली. तसेच २५ हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईलही चोरून नेला. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस अंमलदार गजानन सोनुने आणि चेतन होळकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील टोळीचा सहभाग समोर आला. त्यानुसार विजयपाल कवर सैन याला ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान त्याने अन्य पाच साथीदारांसह गुन्हा केल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन केलेल्या कारवाईत १३९.७२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, फिर्यादीचा मोबाईल, एक धारदार चाकू आणि लोखंडी कटर असा एकूण २१ लाख २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे चैन चोरी व मंगळसूत्र चोरीचे एकूण १३ गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे करीत आहेत.
ही कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले आणि सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, पोलीस निरीक्षक राजेश महाला, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.
