हिंजवडीतील मारुंजी परिसरातून ताब्यात; देशाबाहेर पाठविण्याची प्रक्रिया सुरू
पिंपरी, दि. १४ ऑक्टोबर २०२६ : भारतात व्हिसाची मुदत संपल्यानंतरही कोणतीही मुदतवाढ न घेता अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या युगांडा देशातील तीन महिला नागरिकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाने (एफआरओ) कारवाई केली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारुंजी परिसरात ही कारवाई करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या तिन्ही महिलांविरुद्ध देशाबाहेर पाठविण्याची (डिपोर्टेशन) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत व्हिसाची मुदत संपल्यानंतरही वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांचा, विशेषतः आफ्रिकन देशांतील नागरिकांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) यांनी दिल्या होत्या.
त्यानुसार, परकीय नागरिक नोंदणी विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक राजश्री पावरा यांना गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मारुंजी परिसरात व्हिसाची मुदत संपलेले काही परदेशी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या आदेशानुसार १३ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष शाखेच्या पथकाने सर्व्हे क्रमांक ७/४, शॉप क्रमांक ०३, गेट क्रमांक ०५, हॅपी होम्स, मारुंजी येथे जाऊन पडताळणी केली.
व्हिसाची मुदत संपूनही वास्तव्य
या ठिकाणी युगांडा देशातील डोरेक अहैस्बिवे (DORECK AHAISBIWE), प्रॉसी अंकुंडा (PROSSY ANKUNDA) आणि अमिना कटुसिमी (AMINA KATUSIIME) या तीन महिला आढळून आल्या. पोलिसांनी त्यांच्याकडे पासपोर्ट आणि व्हिसाच्या मूळ प्रतींची मागणी केली असता त्यांनी छायांकित प्रती सादर केल्या.
या कागदपत्रांच्या आधारे आयव्हीएफआरटी (IVFRT) प्रणालीवर पडताळणी केली असता, तिन्ही महिलांकडे युगांडा देशाचे पासपोर्ट आणि व्हिसा असल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी एका महिलेचा विद्यार्थी व्हिसा ७ ऑक्टोबर २०२६ रोजी संपला होता, तर अन्य दोन महिलांचे वैद्यकीय व्हिसा अनुक्रमे २९ डिसेंबर २०२५ आणि ११ नोव्हेंबर २०२५ रोजी संपले होते.
तिन्ही महिलांनी व्हिसाची मुदत संपल्यानंतर भारतात वास्तव्य करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ घेतली नसल्याचे पडताळणीत समोर आले. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन एफआरओ, पिंपरी-चिंचवड यांच्यामार्फत देशाबाहेर पाठविण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
परदेशी नागरिकांची माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन
दरम्यान, परदेशी नागरिक आपल्या खोलीत, बंगल्यात, फ्लॅटमध्ये किंवा हॉटेलमध्ये वास्तव्यास आल्यास संबंधित मालकांनी अथवा व्यवस्थापनाने सी-फॉर्म भरून २४ तासांच्या आत एफआरओ कार्यालयाला माहिती देणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या नियमाचे पालन न केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
तसेच, आपल्या परिसरात कोणताही परदेशी नागरिक अनधिकृतपणे राहत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तातडीने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या एफआरओ विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सदर कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त धीरज पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक राजश्री पावरा, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अहमद शेख तसेच पोलीस अंमलदार सुनिता खोमणे, अक्षय घोडमारे, पाटील, घुले आणि यादव यांनी केली आहे.
