कंत्राट प्रक्रिया आणि आर्थिक हितसंबंधांची निष्पक्ष चौकशी करण्याची सचिन काळभोर यांची मागणी
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रँड टूर सायकल स्पर्धेसाठी प्रस्तावित सुमारे ११३ कोटी रुपयांच्या खर्चाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. या स्पर्धेच्या खर्चासह कंत्राट प्रक्रिया, उपकंत्राटांचे वाटप आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार व लोकप्रतिनिधी यांच्यात संभाव्य आर्थिक हितसंबंध आहेत का, याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
काळभोर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, स्पर्धेसाठी होणाऱ्या खर्चाचे स्वरूप, निविदा प्रक्रिया आणि सार्वजनिक निधीच्या विनियोगाबाबत पारदर्शकता असणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असताना शहरातील मूलभूत नागरी सुविधांकडेही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे त्यांनी नमूद केले आहे.
निगडी ते पिंपरीदरम्यान रस्त्यांची दुरवस्था
निगडी ते पिंपरीदरम्यान मुंबई-पुणे महामार्गावर मेट्रो रेल्वेच्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली असून, मोठमोठे खड्डे पडल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबत वारंवार निवेदने देऊनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कोट्यवधी रुपयांची स्पर्धा आयोजित करण्यापूर्वी नागरिकांच्या दैनंदिन समस्यांना प्राधान्य देऊन रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.
कंत्राट प्रक्रिया आणि उपकंत्राटांची चौकशी करण्याची मागणी
ग्रँड टूर स्पर्धेसाठी देण्यात आलेली कंत्राटे, उपकंत्राटांचे वाटप, कार्यादेश आणि आर्थिक व्यवहार यांची सखोल तपासणी करण्यात यावी. संबंधित कंत्राटदारांकडून लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांना उपकंत्राटे मिळाल्याच्या आरोपांचीही निष्पक्ष पडताळणी करावी. कंत्राट प्रक्रियेत हितसंबंधांचा संघर्ष किंवा नियमबाह्य आर्थिक व्यवहार झाले आहेत का, हे चौकशीतून स्पष्ट व्हावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करून खर्चाचे अंदाजपत्रक, निविदा कागदपत्रे, कार्यादेश, करारनामे, उपकंत्राटे आणि देयकांची तपासणी करावी. चौकशीत अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. तसेच, चौकशीच्या निष्कर्षांसह केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल द्यावा, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.
