महापौर रविभाऊ लांडगे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम; कचऱ्याच्या पुनर्वापरातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
भोसरी, दि. १५ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ल-क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक ६ मधील धावडे वस्ती, भोसरी येथे ‘स्वच्छता ही सेवा’ आणि ‘जी.व्ही.पी.मुक्त शहर’ या उपक्रमांतर्गत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे कचरा साचणाऱ्या ठिकाणाची स्वच्छता करून ‘वेस्ट टू आर्ट’ संकल्पनेतून परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. या उपक्रमातून कचऱ्याचा पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
या मोहिमेदरम्यान जी.व्ही.पी. (Garbage Vulnerable Point) परिसरातील साचलेला कचरा, प्लास्टिक आणि इतर टाकाऊ वस्तू संकलित करून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. तसेच विविध टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून आकर्षक सजावटीच्या वस्तू तयार करण्यात आल्या. त्यामुळे अस्वच्छ दिसणाऱ्या परिसराला स्वच्छ आणि सुशोभित स्वरूप प्राप्त झाले.
महापौर रविभाऊ लांडगे यांच्या उपस्थितीत उपक्रम
या उपक्रमाला पिंपरी-चिंचवडचे महापौर रविभाऊ लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सहाय्यक आरोग्य अधिकारी वाघमारे, मुख्य आरोग्य निरीक्षक दीपक कोटियाना, आरोग्य निरीक्षक लक्ष्मण साळवे, आरोग्य मुकादम सुरेंद्र सारसर व सुधाकर मोरे, योगिता ढाकरे, डिवाइन वेस्ट मॅनेजमेंटचे व्यवस्थापक डी. के. शुक्ला, आकाश परदेशी, निखिल भोसले, रोशन खडगे यांच्यासह संस्थेचे स्वच्छता कर्मचारी आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.
कचरा नव्हे, कलात्मक निर्मितीचे साधन!
कचरा ही केवळ समस्या नसून त्याचा योग्य वापर केल्यास त्यातून उपयुक्त आणि आकर्षक वस्तू तयार करता येतात, हा संदेश ‘वेस्ट टू आर्ट’ संकल्पनेतून देण्यात आला. टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर, कचऱ्याचे वर्गीकरण आणि पर्यावरणपूरक जीवनशैली याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
यावेळी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, परिसर स्वच्छ ठेवणे, ओला व सुका कचरा वेगवेगळा करून देणे आणि कचरा अधिकृत संकलन व्यवस्थेकडे सुपूर्द करणे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
नागरिकांच्या सहभागातून जी.व्ही.पी.मुक्त शहर
शहरातील सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याची प्रवृत्ती कमी करणे, जी.व्ही.पी. पॉईंटचे निर्मूलन करणे आणि नागरिकांच्या सहभागातून स्वच्छ व सुंदर परिसर निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळावे आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले.
