दोघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
पुणे/चाकण प्रतिनिधी : दारू पिण्यासाठी खर्च केलेल्या पैशांपैकी निम्मे पैसे परत मागितल्याच्या रागातून मित्राच्या गळ्यावर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना खेड तालुक्यातील वाकी गावच्या हद्दीत घडली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान संतोषनगर, वाकी गावच्या हद्दीतील ब्रेक्स इंडिया कंपनीसमोरील मोकळ्या जागेत घडली. फिर्यादी अनिकेत तानाजी दगडे (वय ३५, रा. शिरोली, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. अंधोरी, ता. खंडाळा, जि. सातारा) हे आपल्या दोन मित्रांसोबत मोटारसायकलवरून तेथे गेले होते. यावेळी तिघेही झुडपांच्या आडोशाला बसून दारू पीत होते.
दारू पिण्यासाठी खर्च झालेल्या पैशांपैकी निम्मे पैसे परत देण्याची मागणी फिर्यादीने आरोपी गणेश मदन भोर (वय २७) याच्याकडे केली. या मागणीचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी संगनमत करून फिर्यादीचे हात पकडले आणि गाडीच्या चावीला असलेल्या छोट्या चाकूने त्यांच्या गळ्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९(१), ३५१(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गणेश मदन भोर याला अटक करण्यात आली असून, दुसरा आरोपी राजू मास्ती वाळंज (वय ३५, रा. शिरोली, ता. खेड, जि. पुणे) याच्याबाबत पुढील तपास सुरू आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरवडे करीत आहेत.