मंत्रा मोमेंट हौसिंग सोसायटीसमोरील घटना; आरोपी अज्ञात
पिंपरी चिंचवड/मोशी प्रतिनिधी : मोशी येथील मंत्रा मोमेंट हौसिंगच्या कमर्शियल ऑफिस गाळा क्रमांक ७ समोर एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. अज्ञात व्यक्तीने हत्याराने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे आहे. तिच्या अंगात भगव्या रंगाचा टी-शर्ट, त्यावर निळसर रंगाचे जिन्सचे जॅकेट आणि काळसर-हिरव्या पट्ट्यांची ट्रॅकपँट होती. अज्ञात आरोपीने कोणत्यातरी कारणावरून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हत्याराने मारहाण करून तिचा खून केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८२१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेची नोंद १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.३९ वाजता करण्यात आली.मृत महिलेची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नसून, आरोपीबाबतही माहिती समोर आलेली नाही.
