तडीपार असतानाही शहरात प्रवेश; तलवार बाळगणाऱ्या तरुणाला निगडी पोलिसांकडून अटक
पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) : तडीपारीचा आदेश लागू असतानाही शहरात प्रवेश करून तलवार बाळगणाऱ्या एका तरुणाला निगडी पोलिसांनी अटक केली. दयानंद बालाजी ऊर्फ बाबासाहेब घाडगे (वय २०, रा. रूम क्रमांक २५६, सी पत्रा शेड, अजंठानगर, चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अजंठानगर, चिंचवड येथील सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळील सी पत्रा शेड परिसरात हा प्रकार उघडकीस आला.
आरोपी दयानंद घाडगे याला पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-१, पिंपरी-चिंचवड यांनी आदेश क्रमांक ६१/२०२५, दि. १ डिसेंबर २०२५ अन्वये पुणे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्र तसेच पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले होते. असे असतानाही कोणतीही कायदेशीर पूर्वपरवानगी न घेता तो परिसरात आढळून आला. तसेच, पोलीस आयुक्तालयाच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून त्याच्याकडे तलवार असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल किशोर दगडू घोरपडे (वय २५, बकल क्रमांक ३६२३, निगडी पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९०८/२०२६ नुसार भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.