‘आम्ही इथले भाई आहोत’ म्हणत दहशत निर्माण केल्याचा आरोप; घाबरलेल्या दुकानदारांनी दुकाने केली बंद
पुणे/चिखली, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात लोखंडी कोयता हवेत फिरवत दुकानदारांना आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन दहशत निर्माण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी एका २० वर्षीय तरुणासह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १०.४० वाजण्याच्या सुमारास स्पाइन रोडवरील जॉगर्स पार्क गार्डनजवळ, सेक्टर क्रमांक १८, चिखली येथे ही घटना घडली. अनिकेत गणेश देवरे (वय २०, रा. भीमशक्तीनगर, मोरेवस्ती, चिखली) आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने हातात लोखंडी कोयता घेऊन तो हवेत फिरवला. तसेच, ‘आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादी कोणी लागले तर त्याला जिवंत सोडणार नाही,’ अशा धमक्या दिल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे परिसरातील दुकानदार आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दहशतीमुळे दुकानदारांनी आपापली दुकाने बंद केली, तर रस्त्यावरील नागरिकांनी भीतीपोटी धावपळ केली. या दहशतीमुळे कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे येण्यास धजावत नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त यांनी जारी केलेल्या मनाई आदेशानुसार, शहरात ३० सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येणारी शस्त्रे बाळगण्यास मनाई होती. या आदेशाचे उल्लंघन करून कोयता बाळगल्याचा आरोप संबंधितांवर आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार अरुण ज्ञानेश्वर साबळे (वय ४०, नेमणूक चिखली पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्टच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
.