बनावट चावीने कारचे लॉक उघडून केली चोरी; गुन्हे शाखा व रावेत पोलिसांची संयुक्त कारवाई
पिंपरी-चिंचवड : पुनावळे येथील संदिप हॉटेलसमोरील सर्व्हिस रोडवर पार्क केलेल्या कारमधून ५० लाख रुपयांची रोकड चोरी करणाऱ्या दोन आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवघ्या आठ तासांत ताब्यात घेतले. गुन्हे शाखा युनिट-२, मालमत्ता विरोधी पथक आणि रावेत पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चोरीस गेलेली संपूर्ण ५० लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली.
दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १०.५० ते १० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास पुनावळे येथील संदिप हॉटेलसमोरील सिमेंटच्या सर्व्हिस रोडवर ही घटना घडली. पार्क केलेल्या कारचे लॉक बनावट चावीने उघडून अज्ञात व्यक्तीने कारमध्ये ठेवलेली ५० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरून नेली. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हे शाखा आणि रावेत पोलिसांना गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक व्यक्ती बनावट चावीच्या मदतीने कार उघडून रोकड असलेली बॅग घेऊन जात असल्याचे दिसून आले.
तपासादरम्यान फिर्यादीसोबत मुंबईला पैसे आणण्यासाठी गेलेल्या दोन व्यक्तींपैकी चारुदत्त शिवाजी बेंडाले (वय ३०, रा. बेंडाले वस्ती, निघोजे, ता. खेड, जि. पुणे) याच्यावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास केला असता, त्याने कारची बनावट चावी आपला मित्र प्रसाद शिवाजी बनकर (वय २९, व्यवसाय सुपरवायझर, रा. चिंबळी, ता. खेड, जि. पुणे) याला दिली होती. कारमध्ये ५० लाख रुपये असल्याची माहिती देऊन त्याला रोकड चोरी करण्यास सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलिसांनी प्रसाद बनकर याला चिंबळी येथून ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींकडून चोरीस गेलेली संपूर्ण ५० लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून, त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड व बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, परिमंडळ-२ चे पोलीस उपआयुक्त प्रदीप जाधव, गुन्हे शाखा-१ चे सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन राठोड आणि वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील कुन्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सावंत, मालमत्ता विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे, पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, राहुल खिळे तसेच पोलीस कर्मचारी विक्रम कुदळ, कृष्णा शितोळे, गोविंद चव्हाण, आशिष बोटके, गणेश सावंत, विनोद वीर, शामसुंदर गुट्टे आणि तांत्रिक विश्लेषण विभागाचे रमेश कारके यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
.
