नवी सांगवीतील घटना; ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : नवी सांगवी परिसरात मालमत्तेच्या वादातून नातवाने स्वतःच्या आजीच्या गळ्यात चाकू खुपसून खून केल्याची घटना शुक्रवारी (दि. ९) सकाळी घडली. या घटनेनंतर संबंधित नातवाने सांगवी पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
मंगल बाबुराव शिंगोरे (वय ६०, रा. शिंगोरे बिल्डिंग, धर्मवीर बँकेशेजारी, नवी सांगवी, पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेनऊच्या सुमारास आरोपी ऑकर किसन शिंगोरे (वय ३०, रा. राजीव गांधी नगर, गल्ली क्र. १, पिंपळे गुरव) हा सांगवी पोलीस ठाण्यात आला. त्याने मालमत्तेच्या वादातून सकाळी नऊच्या सुमारास आजीच्या गळ्यात चाकू खुपसल्याची माहिती पोलिसांना दिली.
माहिती मिळताच सांगवी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घरातील बाथरूममध्ये मंगल शिंगोरे या गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या. त्यांना तातडीने औंध जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनास्थळी पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ संदीप आटोळे, सहायक पोलीस आयुक्त सांगवी विभाग मनीषा कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल नांदेकर यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
