आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला यश; प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात तैलचित्र लावण्याचे काम पूर्ण
पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तैलचित्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्यालयातील प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात लावण्यात आले आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी ३१ जानेवारी २०२६ रोजी याबाबत महापालिका प्रशासनाकडे पत्राद्वारे मागणी केली होती. या मागणीनुसार आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून तैलचित्र लावण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
महापालिकेच्या स्थापत्य विभागाने आमदार लांडगे यांना पाठविलेल्या अधिकृत पत्रातून ही माहिती दिली आहे. मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील दर्शनी भागात तैलचित्र लावण्यात आले असून, त्यासाठीची आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. महापालिकेचे मुख्य अभियंता–१ प्रमोद ओंभासे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र पाठविण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विकासात अजित पवार यांनी योगदान दिले. रस्ते रुंदीकरण, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि विविध विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांनी विविध विकासकामांमध्ये सहभाग घेतला होता. त्यांच्या कार्याची आणि स्मृतींची जपणूक व्हावी, या उद्देशाने महापालिका मुख्यालयात त्यांचे तैलचित्र लावण्याची मागणी करण्यात आली होती.
