पिंपरी-चिंचवड : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (YCM) तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या इतर रुग्णालये व वैद्यकीय विभागांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या खासगी वाहनांच्या व्यवस्थेची सखोल चौकशी करून खर्चाचा तपशील सार्वजनिक करावा, अशी मागणी भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिकेने भाडेतत्त्वावर घेतलेल्या वाहनांची संख्या, वाहननिहाय भाडे, ठेकेदारांची निवड, निविदा प्रक्रिया, कराराचा कालावधी, चालकांचे वेतन, इंधन व देखभाल खर्च यांची सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच वाहनांचा प्रत्यक्ष वापर, लॉगबुक, ठेकेदारांची बिले आणि देयकांच्या मंजुरीची प्रक्रिया यांची पडताळणी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
सार्वजनिक निधीच्या वापरात पारदर्शकता आवश्यक असून, वाहन व्यवस्थेत आर्थिक किंवा प्रशासकीय अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी आणि चौकशीचा अहवाल लेखी स्वरूपात द्यावा, असे सचिन काळभोर यांनी निवेदनात म्हटले आहे.
