अखंड धनगर समाज पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने चार प्रमुख मागण्या
पिंपरी-चिंचवड, दि. ७ सप्टेंबर २०२६ : धनगर जमातीच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अखंड धनगर समाज, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. निगडी येथील नायब तहसीलदार देशमुख यांच्या माध्यमातून हे निवेदन शासनाकडेअखंड धनगर समाज पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने चार प्रमुख मागण्या सादर करण्यात आले.
धनगर समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
धनगर ST आरक्षणाची प्रभावीपणे बाजू मांडण्याची मागणी
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या विशेष अनुज्ञा याचिकेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने धनगर ST आरक्षणाची बाजू पूर्ण ताकदीने आणि गांभीर्याने मांडावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दि. ८ सप्टेंबर २०२६ पूर्वी धनगर आरक्षणाच्या समर्थनार्थ ठोस, सकारात्मक तसेच सर्व कायदेशीर व घटनात्मक बाबी स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करावे, तसेच अनुभवी व सक्षम वकिलांची नियुक्ती करून धनगर समाजाची बाजू प्रभावीपणे मांडावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच, धनगर ST आरक्षणाबाबत कोणताही प्रतिकूल निर्णय झाल्यास धनगर समाजाला ST प्रमाणपत्राचा लाभ मिळण्यासाठी शासनाने पर्यायी ‘प्लॅन बी’ तयार ठेवावा, अशीही मागणी करण्यात आली.
संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायद्याची मागणी
श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र विशेष शासकीय कायदा करण्यात यावा. देवस्थानच्या विश्वस्त मंडळामध्ये किमान २१ विश्वस्त असावेत आणि विश्वस्त मंडळाचे अध्यक्षपद धनगर समाजातील व्यक्तीस देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
‘मिसिंग लिंक’ला शिंग्रोबा धनगर यांचे नाव द्या
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला स्वातंत्र्यवीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
चर्चगेट स्थानकाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव
मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली.
धनगर समाजाच्या या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन धनगर जमातीला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली.
निवेदन देताना माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे, सूर्यकांत गोफणे, अजय दूधभाते, महादेव कवितके, धनंजय ताणले, बजरंग गडदे, सचिन सरक, विठ्ठल पांढरे, नरेंद्र चऱ्हाटे, मयुरेश चऱ्हाटे, नितीन वाघमोडे, अंबादास पडळकर, सदाशिव पडळकर, सौ. रेखा दूधभाते यांच्यासह अखंड धनगर समाजाचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.