चेंबूरच्या शितळादेवी गोविंदा पथकाने सहा थर रचत फोडली दहीहंडी; हजारो नागरिकांची उपस्थिती
पिंपरीगाव, दि. ५ सप्टेंबर : श्री संदीप वाघेरे युवा मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य दहीहंडी उत्सव २०२६ शनिवारी पिंपरीगाव येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. चेंबूर येथील शितळादेवी गोविंदा पथकाने सहा थरांचा मानवी मनोरा रचत दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला.
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित या उत्सवाला पिंपरीगाव परिसरातील हजारो नागरिक, तरुणाई आणि विविध गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. गोविंदांच्या घोषणांनी आणि ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
या सोहळ्यास मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, आयोजक संदीप वाघेरे, सुलभा उबाळे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, विठ्ठल ऊर्फ नाना काटे, विकास साने, विराज लांडे, निकिता कदम, प्रियांका कुदळे, मीनाताई नाणेकर, श्रीरंग शिंदे, ज्ञानोबा गव्हाणे, सुधाकरजी यादव, वसंत तावरे आणि रामभाऊ कुदळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
अभिनेत्रींच्या उपस्थितीने रंगत
दहीहंडी उत्सवासाठी प्रसिद्ध अभिनेत्री राशी खन्ना, महिमा मकवाना, नेहा सोनवणे आणि रुचिता जामदार यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. अभिनेत्रींची एक झलक पाहण्यासाठी तरुणाईने मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, विविध गोविंदा पथकांनी सादर केलेल्या थरारक मानवी मनोऱ्यांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि घोषणांच्या गजरात दाद दिली. शितळादेवी गोविंदा पथकाने सहा थरांचा मनोरा उभारून दहीहंडी फोडताच परिसरात एकच जल्लोष झाला.
पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने उत्सव शिस्तबद्ध
मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासनाच्या वतीने आवश्यक सहकार्य करण्यात आले. आयोजकांनीही सुरक्षा उपाययोजना आणि शासकीय नियमांचे पालन केल्याने उत्सव उत्साहपूर्ण तसेच शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
संदीप वाघेरे युवा मंचाच्या या आयोजनामुळे पिंपरीगावातील पारंपरिक दहीहंडी उत्सवाला यंदा विशेष रंगत आली. हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यंदाचा दहीहंडी सोहळा अविस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर अहिरराव आणि नीतू भाटिया यांनी केले. उत्सवाच्या नियोजनासाठी युवा मंचाचे अध्यक्ष हरीश वाघेरे यांच्यासह उमेश खंदारे, नितीन गव्हाणे, जितेंद्र वाटकर, किरण शिंदे, राघवेंद्र भांडगे, अक्षय नाणेकर, राजेंद्र वाघेरे आणि गणेश मंजाळ यांनी परिश्रम घेतले.