पुणे/महाळुंगे एमआयडीसी : कंपनीतून माल भरून मोशी येथे जात असलेल्या ट्रकचालकाला तिघा अज्ञात व्यक्तींनी रस्त्यात ट्रक अडवून मारहाण केल्याची घटना मोई गावच्या हद्दीत भैरवनाथ मंदिराजवळ घडली. याप्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघा अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज गोपाळ तोरे (वय २३, व्यवसाय-ड्रायव्हर, सध्या रा. चिखली, मोरे वस्ती, समृद्धी हेरिटेज, फ्लॅट क्र. ३०२, ता. हवेली, जि. पुणे; मूळ रा. गारोळा, ता. चाकूर, जि. लातूर) हे दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील सुप्रो वाहन क्रमांक एमएच १२/डब्ल्यूएक्स ४९९३ मधून एका कंपनीतून माल भरून मोशीकडे जात होते.
मोई रोडवर भैरवनाथ मंदिराजवळ आल्यानंतर तिघा अज्ञात व्यक्तींनी त्यांचे वाहन अडवले. त्यापैकी एकाने तोरे यांना वाहनातून खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर कोणतेही कारण नसताना त्यांना हाताने मारहाण करण्यात आली. तसेच, वाहनातील माल तेथेच खाली करण्यास सांगून आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ६९७/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२), ११५(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोगले करीत आहेत.