पुणे/चाकण प्रतिनिधी : मोटारसायकलवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका ७९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला निर्जन ठिकाणी नेऊन, विश्वास संपादन करत हातचलाखीने सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना चाकण येथे घडली. याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोविंद धर्मराज दर्वेशवार (वय ७९, रा. संतोषनगर, कृष्णानगर कॉलनी, प्लॉट नं. १०, ता. खेड, जि. पुणे) हे ३० ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १० ते १०.१५ वाजण्याच्या दरम्यान मंबरेनगर येथून पायस्कूलच्या समोरील रस्त्यावरून जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरून जाणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवर बसविले.
सदर व्यक्तीने दर्वेशवार यांना पुणे-नाशिक रोडवरील सक्सेस पॉइंट व सूर्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दरम्यान असलेल्या वॉशिंग सेंटरजवळ नेले. तेथे संबंधित व्यक्तीने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन व हातातील अंगठी पाहून, त्या दागिन्यांचा व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या वडिलांना दाखवून आम्हालाही अशाच प्रकारची सोन्याची चेन व अंगठी तयार करायची आहे, असे सांगितले.
या बोलण्यामुळे फिर्यादीचा विश्वास संपादन करून अज्ञात व्यक्तीने हातचलाखीने त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले आणि तेथून पसार झाला. या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे १ लाख ५० हजार रुपये असल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.
घटनेनंतर चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७४४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.