पुणे/तळेगाव एमआयडीसी : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने व दगडाने हल्ला करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींपैकी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दोन विधिसंघर्षित बालकांचाही या प्रकरणात समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे १.३० वाजता तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिक्षक कॉलनी, बराळे येथील एस.डी. फोटो स्टुडिओजवळ ही घटना घडली.
या प्रकरणी सुभाष विष्णू शिंगाडे (वय ५०, व्यवसाय – नोकरी, लोणावळा नगरपालिका, रा. समता कॉलनी, बराळे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांचा मुलगा प्रशांत शिंगाडे हा आपल्या मित्रांसोबत चहा पिण्यासाठी थांबला असताना आरोपींनी जुन्या भांडणाच्या रागातून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करत त्याच्यावर हल्ला केला. आरोपींनी प्रशांतच्या डोक्यावर, हातावर, छातीवर व पाठीवर कोयत्याने वार केले. तसेच डोक्यात मोठा दगड मारून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात प्रशांतचा मृत्यू झाला.
या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१), ३५२, ३५१(२), ३(५), आर्म्स ॲक्ट कलम ४/२५, २७(३), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), (३) सह १३५ तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी साहिल पांडुरंग समुखराव (वय १८ वर्षे ९ महिने), सुनील पांडुरंग समुबराव (वय २४), बना दीपक लोखंडे (वय १९ वर्षे ५ महिने), रोहन हनुमंत सावंत (वय १९ वर्षे ६ महिने), हेमराज गौतम सोनवणे (वय २८ वर्षे), रोशन साच (वय २१ वर्षे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच दोन विधिसंघर्षित बालकांचा या प्रकरणात समावेश आहे. सर्व आरोपी समता कॉलनी, बराळे, ता. मावळ, जि. पुणे परिसरातील रहिवासी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी तपास सुरू केला असून, हल्ल्यामागील नेमके कारण, आरोपींची भूमिका आणि घटनेत वापरण्यात आलेल्या हत्यारांबाबत पुढील तपास सुरू आहे.