पिंपरी प्रतिनिधी : तडीपार आदेशाचा भंग करून पिंपरी परिसरात प्रवेश करत धारदार लोखंडी कोयता बाळगणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला संत तुकारामनगर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. २६) दुपारी महादेव मंदिराजवळ, हिंदुस्तान अॅन्टीबायोटिक कंपनीच्या मोकळ्या मैदानात करण्यात आली.
तौसिफ अब्दुल हाफिज चौधरी (वय २३, रा. बौद्धविहारजवळ, माऊली फ्लोअर मिलजवळ, लालटोपी नगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई वैभव दत्तात्रय सोने यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तौसिफ चौधरी याला पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-१ यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ५६(१)(ब) अन्वये २३ एप्रिल २०२६ रोजीच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून एक वर्षासाठी तडीपार केले होते. मात्र, कोणतीही कायदेशीर लेखी परवानगी न घेता त्याने तडीपार आदेशाचा भंग करून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश केला.
दरम्यान, पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. १९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२६ या कालावधीत घातक शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश लागू असतानाही आरोपीकडे धारदार लोखंडी कोयता आढळून आला. कोणताही दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने तो मोकळ्या मैदानात थांबलेला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२, ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा बुधवारी दुपारी ३.३९ वाजता दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार करीत आहेत.