पुणे/महाळुंगे प्रतिनिधी : चाकण-तळेगाव रस्त्यावर महाळुंगे गावाच्या कमानीजवळ ट्रकचालकाने निष्काळजीपणे व बेदरकारपणे वाहन चालवून दुचाकीला धडक दिल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. या अपघातात दुचाकीस्वार महिला जखमी झाली असून तिच्या उजव्या पायाच्या पोटरीला गंभीर दुखापत झाली. या ठिकाणी तिच्या पायाला तब्बल १५ टाके पडले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजता महाळुंगे कमानीजवळील सिग्नलवर महिला तिच्या स्टार सिटी दुचाकीवरून (एमएच १४ एफवाय ६८५०) थांबली होती. त्यावेळी टाटा ११०९ ट्रक (एमएच ०४ ईबी १६२५) वरील अज्ञात चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून ट्रक निष्काळजीपणे व बेदरकारपणे चालविला. त्याने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीचे नुकसान झाले तसेच महिलेच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली.
या प्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात २६ ऑगस्ट रोजी दुपारी १.१० वाजता अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४, १३४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार होजगे करीत आहेत.