उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण; ‘आशा से श्रेया तक’ विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी, दि.२६ ऑगस्ट २०२६ : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा, पिंपरी-चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी संगीत क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठित ‘आशा भोसले पुरस्कार’ यंदा सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना जाहीर झाला आहे.
या पुरस्काराचा २१ वा सोहळा शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सोहळ्यास विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, आमदार अमित गोरखे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्यासह कला व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
‘आशा भोसले पुरस्कार’चे स्वरूप १ लाख ११ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर मोरया थिएटर निर्मित ‘आशा से श्रेया तक’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. आशा भोसले आणि श्रेया घोषाल यांच्या गाजलेल्या सदाबहार गीतांची सुरेल मैफल या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवता येणार आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम सर्व संगीतप्रेमी आणि नागरिकांसाठी विनामूल्य आहे. कार्यक्रमाच्या नियोजित वेळेच्या किमान अर्धा तास आधी प्रेक्षकांनी आसनस्थ व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील रसिकांनी या सांगीतिक व सांस्कृतिक मेजवानीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन भाऊसाहेब भोईर यांनी केले.
पत्रकार परिषदेस नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष किरण येवलेकर, कोषाध्यक्ष राजेंद्र बंग, सहकार्य संतोष रासने, गौरी लोंढे, सहकोषाध्यक्ष संतोष शिंदे, सदस्य सुदाम परब आदी उपस्थित होते.
दिग्गज कलाकारांना यापूर्वी सन्मान
‘आशा भोसले पुरस्कार’ची सुरुवातीपासूनच गौरवशाली परंपरा राहिली आहे. सन २००२ पासून हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. यापूर्वी गानकोकिळा स्व. लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रवींद्र जैन, बप्पी लाहिरी, प्यारेलाल, आनंदजी, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अनु मलिक, शंकर महादेवन, पं. शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरिहरन, सोनू निगम, सुनिधी चौहान, पद्मभूषण उदित नारायण, रूपकुमार राठोड, अवधूत गुप्ते, डॉ. सलील कुलकर्णी आणि शान यांसारख्या दिग्गजांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
श्रेया घोषाल यांचा संगीतप्रवास
१२ मार्च १९८४ रोजी जन्मलेल्या श्रेया घोषाल यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. कोटा येथे पं. महेशचंद्र शर्मा आणि मुंबईत मुक्ता भिडे यांच्याकडे त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर झी टीव्हीवरील ‘सारेगामापा’च्या चिल्ड्रेन स्पेशल पर्वाचे विजेतेपद मिळवत त्यांनी संगीत क्षेत्रातील आपल्या कारकिर्दीची मुहूर्तमेढ रोवली.
‘देवदास’ (२००२) चित्रपटातील ‘बैरी पिया’ आणि ‘डोला रे’ या गीतांनी त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी ओळख मिळवून दिली. त्यानंतर हिंदीसह मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, आसामी, भोजपुरी आणि पंजाबी अशा विविध भाषांमध्ये त्यांनी हजारो गीते गायली आहेत. ‘जादू है नशा है’, ‘बरसो रे’, ‘तेरी ओर’, ‘ये इश्क हाय’, ‘दीवानी मस्तानी’, तसेच मराठीतील ‘जीव दंगला’ आणि ‘मेरे ढोलना’ ही त्यांची गाजलेली गीते आहेत.
श्रेया घोषाल यांच्या गायनाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार आणि फिल्मफेअर साऊथ पुरस्कारांसह अनेक प्रतिष्ठित सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. अमेरिकेतील ओहायो राज्याने २६ जून हा दिवस ‘श्रेया घोषाल डे’ म्हणून घोषित केला आहे. लंडन येथील ब्रिटिश संसदेतही भारतीय संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे.
स्वतंत्र निवड समितीद्वारे निवड
‘आशा भोसले पुरस्कार’साठी स्वतंत्र निवड समिती कार्यरत आहे. या समितीत ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, डॉ. रवींद्र घांगुर्डे, वंदना घांगुर्डे, दिलीप काटकर, राजेशकुमार साकला आणि भाऊसाहेब भोईर यांचा समावेश आहे.
