अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन व नवकल्पनांचे सादरीकरण; मान्यवर तज्ज्ञांची व्याख्याने
पुणे प्रतिनिधी : अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, उद्योग आणि नवकल्पनांचा संगम घडवून आणणाऱ्या ‘AWTIS 2026’ तंत्रज्ञान व नवकल्पना परिषदेचे आयोजन १८, १९ व २० सप्टेंबर २०२६ रोजी पुण्यातील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेल येथे करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत ‘आर्यन्स’च्या विविध अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांतील प्रकल्प, उत्पादने आणि नवकल्पनांचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात येणार असून, विविध विषयांवर मान्यवर तज्ज्ञांची व्याख्यानेही होणार आहेत.
या परिषदेला ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’चे संचालक अजय जगताप, संजय शेंडगे, कामेश मोदी, हायड्रोजन विभाग प्रमुख डॉ. विकास शिंदे, सौरऊर्जा विभागप्रमुख भूषण देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
परिषदेत अर्धसंवाहक व सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, यंत्रमानव व स्वयंचलन, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ तंत्रज्ञान व उपग्रह, प्रक्षेपण वाहने व विमान-अंतराळ तंत्रज्ञान, संरक्षण तंत्रज्ञान, विद्युत दुचाकी व चारचाकी वाहने, हायड्रोजन अर्थव्यवस्था, क्वांटम तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा, डिजिटल पायाभूत सुविधा व डेटा सेंटर्स, माहिती तंत्रज्ञान व संगणक प्रणाली, कृषी तंत्रज्ञान, आरोग्य तंत्रज्ञान आणि ग्राफीन यांसह विविध अत्याधुनिक क्षेत्रांचा समावेश आहे.
पूर्ण विकसित उत्पादने प्रत्यक्ष पाहण्याची संधी
विविध तंत्रज्ञान क्षेत्रांतील पूर्ण विकसित उत्पादने प्रत्यक्ष सादर केली जाणार, हे या परिषदेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. काही निवडक उत्पादने व तंत्रज्ञान तांत्रिक कारणांमुळे प्रोटोटाइप स्वरूपात प्रदर्शित केले जाणार आहेत.
उद्योग प्रतिनिधी, संशोधक, विद्यार्थी, तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची, त्याची कार्यपद्धती समजून घेण्याची आणि भविष्यातील उपयोगांविषयी माहिती जाणून घेण्याची संधी या परिषदेत मिळणार आहे.
स्टार्टअप व डीआरडीओ पॅव्हिलियन आकर्षणाचे केंद्र
स्टार्टअप पॅव्हिलियन, संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे (डीआरडीओ) दालन तसेच इंडस्ट्री अँड ॲकॅडेमिक पॅव्हिलियन ही परिषदेची विशेष आकर्षणे ठरणार आहेत. संशोधन व विकास क्षेत्रातील विविध उपक्रमांसोबतच प्रसारमाध्यमांनाही परिषदेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मान्यवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
परिषदेच्या तिन्ही दिवशी विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने व मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. जैवऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. ज्येष्ठराज जोशी, इस्रोचे माजी शास्त्रज्ञ व ‘लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम्स’चे उपसंचालक डॉ. नवल किशोर गुप्ता, नामवंत लेखक, व्यवस्थापनतज्ज्ञ व विचारवंत अच्युत गोडबोले, तसेच ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’चे संदीप रायरीकर आदी तज्ज्ञ विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. रायरीकर हे ‘हायड्रोजन वाहनांसाठी नियामक आराखडा’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.
विचारांची देवाणघेवाण व भविष्यातील संधी
तज्ज्ञांच्या सत्रांमधून विद्यार्थी आणि संशोधकांना विविध क्षेत्रांतील अनुभवी तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन मिळणार आहे. त्याचबरोबर उद्योग प्रतिनिधी, नवउद्योजक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांना उदयोन्मुख तंत्रज्ञान, संशोधनातील बदल, उद्योग क्षेत्रातील नव्या दिशा आणि भविष्यातील संधी याबाबत माहिती मिळणार आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष प्रदर्शनासोबतच उद्योग, संशोधन, शिक्षण आणि नवकल्पना यांच्यात विचारांची देवाणघेवाण घडवून आणणारे व्यासपीठ म्हणून ‘AWTIS 2026’ परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
