पिंपरी, दि. २५ ऑगस्ट : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली यांच्या ७५०व्या जन्मवर्षाचे औचित्य साधून श्री. संदीप बाळकृष्ण वाघेरे यांच्या वतीने ‘मोगरा फुलला’ या विशेष भक्तिमय संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात हा कार्यक्रम रंगणार आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्य, अध्यात्म आणि भक्तिपरंपरेचा वेध घेणारे व्याख्यान डॉ. गणेश शिंदे देणार आहेत. तसेच प्रसिद्ध गायिका सौ. सन्मिता शिंदे यांच्या सुमधुर स्वरातून संत ज्ञानेश्वर माउलींच्या अभंग आणि ओव्यांचा भक्तिरस रसिकांना अनुभवता येणार आहे.
‘मोगरा फुलला’ हा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचे अभंग, ओव्या, आध्यात्मिक विचार आणि भक्तिपरंपरा संगीताच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचविणारा विशेष सांस्कृतिक उपक्रम आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतमय साहित्याचा, त्यांच्या अध्यात्मिक विचारांचा तसेच महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचा जागर या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
संत ज्ञानेश्वर माउलींच्या साहित्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाला समृद्ध दिशा दिली आहे. त्यांच्या अभंग-ओव्यांमधील भक्ती, ज्ञान, अध्यात्म आणि मानवतावादी विचार आजही समाजाला प्रेरणा देतात. संगीत आणि व्याख्यानाच्या माध्यमातून या विचारांचा जागर करण्याचा प्रयत्न ‘मोगरा फुलला’ या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.
ज्ञानेश्वर माउलींच्या भक्तिरसात रसिकांना चिंब भिजविणारा हा सुरेल आणि अध्यात्मिक सोहळा पिंपरी-चिंचवड शहराच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणारा ठरणार आहे. शहरातील नागरिक आणि रसिकांसाठी हा कार्यक्रम अविस्मरणीय सांस्कृतिक पर्व ठरेल, असा विश्वास आयोजक श्री. संदीप वाघेरे यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
