हिंजवडी प्रतिनिधी….हिंजवडी पोलीस ठाण्यात गोपाळ दादा साळुंखे (वय २६, रा. सुतार चौक, म्हाळुंगे, पुणे) आणि त्याच्या दोन ते तीन साथीदारांविरुद्ध मारहाण व हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २१ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८.२० वाजता दत्तवाडी, नेरे येथील कासारसाई रोडवरील जाधव पाटील पेट्रोलियम, इंडियन ऑईल कंपनीच्या पेट्रोल पंपावर घडली. याप्रकरणी ओमकार हनुमंत जाधव (वय ३०, रा. पाटीलवस्ती, नेरे, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव हे पेट्रोल पंपावर काम करीत असताना आरोपी साळुंखे व त्याचे साथीदार पांढऱ्या रंगाच्या होंडा कारमधून तेथे आले. सुमारे सहा महिन्यांपूर्वी फिर्यादी आणि विठ्ठल यांच्यात झालेल्या भांडणात तू मध्ये का पडला होतास, असे म्हणत आरोपीने जुन्या वादाचा राग मनात धरून जाधव यांना शिवीगाळ केली.
यानंतर आरोपीने हातातील लोखंडी हत्याराने जाधव यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर तसेच डाव्या हाताच्या अंगठ्यावर वार केले. या हल्ल्यात जाधव गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपी व त्याचे साथीदार घटनास्थळावरून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ५७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, आर्म्स अॅक्ट तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.