हिंजवडी प्रतिनिधी: रिक्षाचे २० रुपये भाडे देण्यावरून झालेल्या वादातून रिक्षाचालकाला लोखंडी टॉमीने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना वाकड येथील भुमकर चौकातील मच्छी मार्केट परिसरात घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश लक्ष्मण चंदनशिवे (वय ३०, रा. विनोदेवस्ती, वाकड) हे रिक्षा चालवितात. दि. २१ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ते डांगे चौकातून रिक्षा चालवत आरोपींसोबत भुमकर चौक मच्छी मार्केट येथे आले. रिक्षाचे २० रुपये भाडे देण्याच्या वेळी आरोपींनी भाडे न देता दारू पिण्यासाठी २०० रुपये मागितले. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने वाद झाला.
यावेळी आरोपी हणमंत बिराजदार (वय ३२, रिक्षाचालक, रा. विनोदेवस्ती, वाकड) आणि मंगेश गायकवाड यांनी फिर्यादीला लोखंडी टॉमीने डोक्यात मारून जखमी केले. तसेच हाताने मारहाण करून शिवीगाळ व धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५६९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ तसेच संबंधित जुन्या कायद्यातील कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.